- आमदार डॉ. आशिषराव देशमुखांनी केली मंत्रालयात भेट; सावनेर येथील प्रकल्पाला तत्वत: मंजुरी.

नागपूर (मंगेश उराडे, प्रतिनिधी): सावनेर-कळमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या कोलार नदीला प्रदूषणमुक्त करून तिला बारमाही स्वच्छ जलप्रवाह असलेले ‘जीवंत नदी’चे रूप देण्यासाठी नियोजित असलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याच्या पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिले आहे. आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी आज, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात पंकजा मुंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले, यावर त्यांनी प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद देत तत्वत: मंजुरी दिली.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन, सावनेर नगरपरिषद क्षेत्रांतर्गत वाहणाऱ्या कोलार नदीच्या ५ किलोमीटर प्रवाहाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले.
नीरीच्या सहकार्याने प्रकल्प
सावनेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाचे महत्त्व जाणून तातडीने कार्यवाही केली होती.
- त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर यांच्या सहयोगाने कोलार नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नियोजन केले आहे.
- या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली होती.
सामाजिक चळवळीला आमदार देशमुखांची साथ
सावनेर शहरातील सामाजिक संघटना समर्पण फाउंडेशन तर्फे २०१९ मध्ये ‘कोलार पुनरुज्जीवन अभियान’ सुरू करण्यात आले होते. आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या सामर्थ्याच्या साथीमुळे या मोहिमेला आता निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे.
आमदार देशमुख यांनी यापूर्वी NEERI च्या उच्चपदस्थ अधिकारी व वैज्ञानिकांसोबत मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर आणि समर्पण फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. यामध्ये कोलार नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करून तिला स्वच्छ जलधारिणी बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहयोगाने दीर्घकाळ टिकणारी पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावर सविस्तर चर्चा झाली होती.
कोलार नदी संवर्धनाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी लक्ष दिल्यामुळे समर्पण फाउंडेशन आणि शहरातील सर्व स्तरांवरील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे,
एनटीव्ही न्यूज मराठी, सावनेर, नागपुर.
