
(प्रतिनिधी : भिवसेन टेमकर)
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र लोहसर येथील वैभव संपन्न व जागृत श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा यंदा अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. ६ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत हा सोहळा असून, यानिमित्ताने शिव महापुराण कथेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
विनोद कृष्ण शास्त्री यांच्या वाणीतून शिवपुराण
भैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सलग सात दिवस, रोज रात्री ८ ते ११ या वेळेत, वृंदावन धाम येथील राष्ट्रीय कथा प्रवक्ते परमपूज्य विनोद कृष्ण शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून शिव महापुराण कथा कार्यक्रम संपन्न होईल. विनोद कृष्ण शास्त्री हे आपल्या अमृतवाणीतून शिवाची महिमा आणि दुःख, दारिद्र्य, अडीअडचणी व संकटात शिव उपासना व शिव आराधना कशी करावी, याचे शिव महापुराणातील अनेक संदर्भ देऊन मार्गदर्शन करणार आहेत.
भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला हा कथा कार्यक्रम महिला व शिव भक्तांसाठी एक अलभ्य पर्वणी असणार आहे.

सोहळ्याचा समारोप
जन्मोत्सव सोहळ्याचा समारोप १३ नोव्हेंबर रोजी होणार असून, लोहसर गावचे सुपुत्र महंत संतोष शास्त्री निरंजन संस्थान, एकनाथवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
भक्तांसाठी भक्त निवास
भैरवनाथ देवस्थान ट्रस्टर्फे वार्षिक अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील भाविक भक्तांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे ३ कोटी खर्चाचे भव्य-दिव्य सुसज्ज असे भक्त निवासाचे काम परिसरातील भाविक भक्त व देवस्थान उत्पन्नातून प्रगतीत आहे.
भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यास उद्यापासून (६ नोव्हेंबर) सुरुवात होत असून, भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, चेअरमन रावसाहेब वांढेकर, व ह.भ.प. रवींद्रदेवा जोशी यांनी केले आहे.
प्रतिनिधी भिवसेन टेमकर,
एनटीव्ही न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.
