- ड्रग्ज तस्करी, गुंडगिरी वाढल्याने चिंता व्यक्त; पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कारवाईची मागणी.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे, मात्र सध्या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, दहशतवाद आणि अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांचा धाक संपला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत अहिल्यानगर जिल्ह्याला पुन्हा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून प्रस्थापित करावे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
आमदार तांबे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे सो. यांना पत्र लिहून जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
ड्रग्जचा सहज पुरवठा, पोलिसांवर प्रश्नचिन्ह
आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जिल्ह्याला मिळणे अभिमानास्पद आहे, परंतु एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्यातील ‘आदर्श आणि गुन्हेगारीमुक्त’ म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे.
- ड्रग्जच्या वाढत्या घटना सातत्याने कानावर येत आहेत. पोलिसांचे संरक्षण आहे की काय, अशी शंका निर्माण व्हावी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज अगदी खेडोपाडी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.
- जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे की नाही, आणि असेल तर ती नेमकी काय करते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर्स सुरू झाली असून, ती जिल्ह्याच्या समाजव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

ट्रॅफिक समस्या आणि पोलिसांचा संपलेला धाक
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘ट्रॅफिक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे की नाही’, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना झाली आहे.
एकंदरीत जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस प्रशासनाचा धाक संपलेला आहे. वाढलेली गुन्हेगारी, चोऱ्या, दरोडे, महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी आणि ट्रॅफिक समस्या अत्यंत चिंताजनक आहे. यापूर्वीही त्यांनी २९ जुलै २०२५ रोजी कायदा सुव्यवस्थेबाबत स्मरणपत्र दिले होते, असे तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे.
नाशिकच्या धर्तीवर उपक्रम राबवावा
आमदार तांबे यांनी पोलीस अधीक्षकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम बनवावी आणि पूर्वीप्रमाणे हा जिल्हा आदर्श व गुन्हेगारीमुक्त करावा. नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानाप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही ‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हा आदर्शवत उपक्रम राबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रतिनिधी रजत दायमा,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
