• अहमदनगर पोलिसांकडून नागरिकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचण्याचे मार्गदर्शन.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे सो., आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलबुर्मे सो. यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आज, दिनांक २६/१०/२०२५ रोजी सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्च, तारकपूर, अहमदनगर येथे सायबर जागरूकता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चर्चमधील सुमारे २०० ते २५० नागरिकांनी सहभाग घेतला.

नागरिकांना सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध करण्यासाठी तसेच होणाऱ्या फसवणुकीबाबत माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि बचावाचे उपाय

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी केली. त्यांनी उपस्थितांना ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest), मोबाईल हॅकिंग, बनावट (फेक) अकाऊंट तयार करणे आणि आर्थिक फसवणूक कशाप्रकारे होते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. फसवणुकीपासून कसे वाचता येईल, सायबर गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत आणि आरोपींना कसे पकडले जाते, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, आयटी ॲक्ट (IT Act) अंतर्गत येणारे सायबर गुन्हे, सायबर पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे आणि त्यासाठी असणारी शिक्षा व द्रव्यदंड (दंड) याबाबतही त्यांनी माहिती दिली.

त्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे साहेब यांनी पीपीटी (PPT) च्या माध्यमातून सायबर क्राईमचे विविध प्रकार समजावून सांगितले. त्यांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक डिटेल्स आणि ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर न करण्याबाबत आवाहन केले.

  • व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे होणारी फसवणूक.
  • बँकेच्या नावाने येणाऱ्या बनावट (APK) लिंक फाईल्स.
  • बँकेचे नाव वापरून खोटे कॉल येणे.
  • लॉटरी लागल्याचे खोटे कॉल.
  • शेअर्स/ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचे आमिष.
  • टार्गेट पूर्ण करून किंवा व्हिडिओ शेअर करून पैसे मिळवण्याचे आमिष.
  • फेक वेबसाईट, मोबाईल हॅकिंग.

याव्यतिरिक्त, त्यांनी बँक पासवर्ड आणि सिक्युरिटी वारंवार अपडेट ठेवणे, अनोळखी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये, कोणत्याही लिंकवर आपली माहिती अपडेट किंवा शेअर न करणे आणि ‘एनी डेस्क’ (Any Desk), ‘टीम व्ह्यूअर’ (Team Viewer) सारखी ॲक्सेसेबल ॲप्लिकेशन्स डाउनलोड न करण्याबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी नायजेरियन फ्रॉड याबद्दलही माहिती दिली.

पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी मोबाईल दहशतवाद (Mobile Terrorism) आणि आर्थिक फसवणूक होण्यापासून कसे वाचता येईल, तसेच सध्या नवीन प्रकारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देऊन उपस्थितांना सतर्क केले.

महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक

प्राध्यापक वैभव लोंढे यांनी सायबर फसवणूक झाल्यास संपर्क साधण्यासाठी असलेल्या १९३० आणि १९४५ या टोल फ्री (Toll-Free) क्रमांकांची माहिती दिली आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून दूर राहण्याबद्दल किंवा सतर्क राहण्याबद्दल मार्गदर्शन केले.

हा सायबर जागरूकता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुदाम काकडे, पोलीस नाईक अभिजीत अरकल, प्राध्यापक वैभव लोंढे, संजू काकडे सर आणि वाघमारे सर यांनी विशेष पुढाकार घेतला. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मोरेश्वर पेंदाम (पो. नि., सायबर पो. स्टे.), श्री. सुदाम काकडे (पो. उपनिरीक्षक), पो. ना. अभिजीत अरकल आणि स. फो. मोहम्मद शेख यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले.

प्रतिनिधी रजत दायमा,

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *