- नगर विकास विभागाच्या दुर्लक्षानंतर आयोगाची कठोर भूमिका..

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आता तिसऱ्यांदा नगर विकास विभागाला आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगर विकास विभागाने यापूर्वी आयोगाने पाठवलेल्या दोन पत्रांवर कोणतीही कार्यवाही न केल्याने, निवडणूक आयोगाने आता कठोर भूमिका घेत तातडीने चौकशी करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी २४ मे २०२५ रोजी आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळे डांगे यांची नियुक्ती झाली असून, ते मनपा कामकाजात पक्षपातीपणा करत असल्याचा त्यांचा दावा आहे.

या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाने ४ जून २०२५ रोजी नगर विकास विभागाला पहिले पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आयोगाने १० ऑक्टोबर रोजी दुसरे पत्र पाठवूनही कार्यवाही झाली नाही.
या पार्श्वभूमीवर, शेख यांनी १६ ऑक्टोबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यामध्ये त्यांनी नमूद केले की, नगर विकास विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आयुक्त डांगे यांनी प्रभाग रचना करताना पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार जगताप यांच्या दबावाला बळी पडून विरोधक उमेदवारांच्या प्रभागांची मोडतोड केली आहे.
या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ तिसरे पाऊल उचलले आहे. आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी काल (२७ ऑक्टोबर) नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांना पत्र पाठवून, आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवरील आक्षेपांची सविस्तर चौकशी करून नियमानुसार तातडीने पुढील आवश्यक कार्यवाही करावी आणि अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड मनपा येथे सहायक आयुक्त असताना, पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार जगताप यांनी कौटुंबिक कारणे आणि रिक्त पद या कारणास्तव जुलै २०२४ मध्ये डांगे यांच्या नियुक्तीची शिफारस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
नगर विकास विभागाने आयोगाच्या दोन पत्रांकडे दुर्लक्ष केल्याने, शेख यांनी पुन्हा आयोगाकडे तक्रार करून डांगे यांची अन्यत्र बदली करण्याची आणि त्यांच्या जागी सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. प्रभाग रचनेतील कथित मोडतोडीमुळे डांगे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकीत पक्षपात होऊन निष्पक्षपाती निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
आता या तिसऱ्या आदेशावर नगर विकास विभाग काय कार्यवाही करते आणि राज्य निवडणूक आयोगाला काय अहवाल पाठवतो, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी इकबाल शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
