पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ चा त्र्यंबकेश्वर येथून उत्साहात प्रारंभ.
ढोल, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात शहरातून निघाली भव्य जलदिंडी.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर सपत्नीक जलपूजन.
लोकसहभागातून जलव्यवस्थापन सक्षम करण्याचा सरकारचा संकल्प.
NASHIK | राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चा आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात शुभारंभ झाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर जलपूजन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ढोल, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देत भव्य जलदिंडी काढण्यात आली. यावेळी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज आणि आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. जलपूजनानंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून मार्गस्थ झाली.

या सोहळ्याला आमदार हिरामण खोसकर, आमदार गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर शहरातून निघालेल्या या जलदिंडीचा श्री स्वामी समर्थ गुरूपीठ येथे समारोप झाला. जलसंवर्धनाचा संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, सोनल शहाणे, वैभव भागवत, नीलेश पाटील, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि आचार्य तुषार भोसले यांच्यासह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रतिनिधी: नाशिक
