- “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध” या संकल्पनेसह चाळीसगावात जागतिक हिवताप दिवस साजरा.
- महात्मा फुले आरोग्य संकुल आणि निवासी शाळेत कीटकजन्य आजारांवर सखोल मार्गदर्शन.
- आरोग्य पथकाकडून जलद ताप सर्वेक्षण; संशयित रुग्णांचे घेतले रक्तनमुने.
- डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हत्तीरोग प्रतिबंधासाठी नागरिकांना दिले आरोग्य शिक्षण.
JALGAON | “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” या थीमसह आज २५ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव शहरात जागतिक हिवताप दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय आणि विविध शाळांमध्ये भेटी देऊन आरोग्य पथकाने आजारांविषयी जनजागृती केली.
चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुल, ग्रामीण रुग्णालय तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य सेवक दीपक ठाकरे, चंद्रकांत चौधरी आणि नामदेव अहिरे यांनी हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हत्तीरोग यांसारख्या कीटकजन्य आजारांविषयी सखोल माहिती दिली. आरोग्य पथकाने शहरातील विविध भागांना भेटी देऊन डास अळी विरोधी उपाययोजना, प्रतिबंध आणि निदानावर प्राथमिक उपचार कसे करावे, याचे आरोग्य शिक्षण दिले. तसेच, जलद ताप सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ताप असलेल्या रुग्णांचे तातडीने रक्तनमुने घेण्यात आले. या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन जाधव आणि हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा जनजागृतीचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
एनटीव्ही न्यूज मराठी, चाळीसगाव
