- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी येथील २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या.
- बदनापूर आयटीआय महाविद्यालयासमोरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह.
- कष्टाळू व मनमिळावू तरुणाच्या अचानक जाण्याने पाडळी परिसरावर शोककळा.
- आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू.
JALNA | जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी येथील ज्ञानेश्वर शिवाजी सिरसाट (वय २७) या नवतरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बदनापूर आयटीआय महाविद्यालयासमोरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
ही घटना दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ज्ञानेश्वर सिरसाट हा होतकरू, कष्टाळू व सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा युवक म्हणून परिसरात परिचित होता. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाने पाडळी तसेच आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, जालना.
