यावल तालुक्यातील नागादेवी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१ मध्ये नव्याने अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. वनविभागाने तपास करत तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
३० जुलै २०२६ रोजी नागादेवी वनक्षेत्रात गस्त सुरू असताना ठिकठिकाणी झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. तोडलेल्या झाडांच्या खुंटांवर जप्तीचा शिक्का मारून लाल रंगाने २४ ते ८५ क्रमांक देण्यात आले आणि खुंटांचे मोजमाप घेण्यात आले. एकूण १.६९३ घनमीटर लाकूड आढळून आले असून, त्याची अंदाजे किंमत २१ हजार ११९ रुपये असल्याचे वनविभागाने नमूद केले. प्रकरण रजिस्टर क्र. ०३/२०२६ अन्वये तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान १९ ऑगस्ट रोजी उकार महान बारेला, वय ४३, जगन जया बारेला, वय ३४ आणि चेलारसिंग मोहन बारेला, वय ४४, सर्व रा. नागादेवी-सावखेडा सीम, ता. यावल, जि. जळगाव, यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६(१) (अ), (ड) व (फ) अन्वये २ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. सौरीश सहाय, सहायक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल संजय बी. इंडे, दीपक परदेशी, सुधीर पटणे, सीमा भालेराव, सरला भोंगरे, चेतन शेलार, योगेश मुंढे, रणधीर काटे तसेच सर्व वनसेवकांनी कारवाईत सहभाग घेतला.
