विरावली येथील रहिवासी आणि सध्या किनगाव येथे वास्तव्यास असलेल्या एस. बी. पाटील यांचे चिरंजीव समीर पाटील यांनी जर्मनीतील IU International University of Applied Sciences येथून संगणकशास्त्रातील मास्टर्स पदवी पूर्ण करत उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरी केली आहे. त्यांच्या मास्टर्स प्रबंधासाठी १०० पैकी तब्बल ९८.४ गुण मिळवत १.० ही सर्वोच्च श्रेणी मिळाली असून, त्यांना ‘Best Thesis Award’ देऊन गौरविण्यात आले.
समीर पाटील यांच्या मास्टर्स प्रबंधाचा विषय “Design and Implementation of an End-to-End Automation Pipeline for Semiconductors in the Area of Product Management” असा होता. हा प्रकल्प त्यांनी जर्मनीतील आघाडीची कंपनी Bosch यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष औद्योगिक समस्येवर आधारित विकसित केला. सेमीकंडक्टर क्षेत्रातील विविध स्रोतांमध्ये विखुरलेल्या उत्पादन नियोजनाच्या डेटाचे सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी त्यांनी एंड-टू-एंड ऑटोमेशन पाइपलाइन विकसित केली. या प्रकल्पामुळे प्रक्रियेतील मॅन्युअल कामाचा सुमारे ६७ टक्के भार कमी झाला, डेटा गुणवत्तेत सुधारणा झाली आणि विविध स्रोतांमधील माहिती एका केंद्रीकृत व विश्वासार्ह डेटास्रोतामध्ये उपलब्ध झाली. परिणामी जलद व डेटा-आधारित निर्णय घेणे शक्य झाले तसेच Bosch साठी लक्षणीय वार्षिक खर्च बचतीची संधी निर्माण झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल यावल शहराच्या प्रथम नागरिक छाया अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील सर, छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत आबा पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, गॉड्स विथ इंग्लिश स्कूलचे चेअरमन विजय पाटील, किनगावचे माजी सरपंच संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, साकळी गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील आणि आर. जी. पाटील नाना यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी समीर पाटील यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे विरावली, किनगाव तसेच संपूर्ण यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
