शेवगाव शहरातील शिवाजी चौक, सोनार गल्ली आणि मेन पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभी केली जाणारी दुचाकी वाहने वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहेत.
या परिसरात मोठी दुकाने तसेच हॉस्पिटल असल्याने नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, अनेक ठिकाणी स्वतःची पार्किंग व्यवस्था नसतानाही दुचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
अरुंद रस्त्यावर वाहने एकमेकांना बाजू देताना अडचणी निर्माण होत असून, किरकोळ कारणावरून वाहनचालकांमध्ये वाद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. तसेच पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि संबंधित हॉस्पिटल व मोठ्या दुकानांना पार्किंग व्यवस्था करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
