अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणा आणि शेतीतील नापिकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ४५ वर्षीय संजय भोपतराव भलावी यांचा शेतात मृत्यू झाला आहे.
संजय भलावी यांची बोरगाव निस्ताने शिवारात पावणेदोन एकर शेती आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी शेतातील कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी शेतात जेवण केले. त्यानंतर काही वेळाने शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास ते मृतावस्थेत आढळून आले.
संजय भलावी यांच्यावर बँकेचे तसेच खासगी कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातच शेतीतील नापिकीमुळे ते आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जात आहे. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संजय भलावी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत असून, मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि इतर कारणे तपासानंतर समोर येणार आहेत.
जावेद खान | एनटीव्ही न्यूज मराठी
