- ३५ वर्षीय पद्माकर उदयभान कुरसंगे यांची गळफास घेऊन धक्कादायक आत्महत्या.
- चिंचोली येथे मध्यरात्रीच्या सुमारास अंगणातील झाडाला बांधला फास.
- मंगरूळ दस्तगीर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा; धामणगाव रेल्वे येथे मृतदेह रवाना.
- घटनेमुळे नागठाणा आणि चिंचोली परिसरात पसरली मोठी शोककळा.
AMRAVATI | अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचोली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
मृत व्यक्तीचे नाव पद्माकर उदयभान कुरसंगे (वय ३५, रा. नागठाणा, वर्धा) असे असून, ते सध्या चिंचोली येथे आपल्या सासरवाडीला नामदेव पुष्पा वरटी यांच्याकडे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घरातील पत्नी आणि मुले झोपेत असताना पद्माकर यांनी अंगणातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब सकाळी ६ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच मंगरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मंगरूळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधी जावेद खान, अमरावती चिंचोली.
