दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान आणि उत्पन्न घटल्याने महिला बचत गटांसमोर कर्जफेडीचे संकट उभे राहिले आहे. सक्तीची कर्जवसुली थांबवून कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी आडगावच्या महिलांनी यावल तहसील कार्यालयात निवेदन दिले.
यावल तालुक्यातील आडगाव येथील महिला बचत गटांच्या सदस्यांनी बुधवारी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांना निवेदन दिले.
यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.
अशा परिस्थितीत वसुली प्रतिनिधींकडून वारंवार हप्त्यांसाठी दबाव टाकला जात असून काही महिलांना अपमानास्पद बोलले जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
सक्तीची कर्जवसुली थांबवावी, वसुलीच्या पद्धतीची चौकशी करावी, कर्जफेडीसाठी मुदत द्यावी तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी महिलांनी केली.
यावेळी नफिसा तडवी, शबनम तडवी, रुबीना तडवी, सायरा तडवी, नूरजान तडवी, साबेरा तडवी, किस्मत तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
