जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातून एका विवाहित महिलेसह तिची दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावत तिघांना पळवून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून, याप्रकरणी यावल पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सांगवी बुद्रुक, तालुका यावल येथील रहिवासी सोनी विकास पांडव (वय २४ वर्षे), त्यांचा मुलगा कुणाल विकास पांडव (वय १२ वर्षे) आणि मुलगी खुशी विकास पांडव (वय १० वर्षे) हे तिघे बेपत्ता झाले आहेत.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावत या तिघांना पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला तिघांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत.
अखेर विकास वना पांडव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप पुढील तपास करीत आहेत.
