धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे शेतातील गोठ्यातून गाय आणि दोन शेळ्या चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला. या घटनेनंतर गावातील तरुणांनी एकत्र येत ‘ग्राम सुरक्षा’ व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला असून, रात्रीची गस्तही सुरू केली आहे.
येडशी येथील रेल्वे स्टेशनजवळील शेतात राहणारे शेतकरी मारुती शंकर गव्हार यांच्या गोठ्यातून गाय आणि दोन शेळ्या चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बुधवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती गव्हार हे कुटुंबासह शेतात राहतात. त्यांच्या घराशेजारीच जनावरांचा गोठा आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा कोंडा कापून आत प्रवेश केला. त्यानंतर गोठ्यातील दुचाकी बाहेर काढून तिची वायर तोडली, जेणेकरून कोणी त्यांचा पाठलाग करू नये.
त्यानंतर चोरट्यांनी गोठ्यातील गिर गाय आणि दोन शेळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला. जनावरे नेत असताना झालेल्या आवाजाने मारुती गव्हार यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करताच घाबरलेल्या चोरट्यांनी जनावरे सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यामुळे जनावरे बचावली.
गावात भीतीचे वातावरण; तरुण सरसावले
दरम्यान, येडशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गावातील तरुणांनी एकत्र येत ‘ग्राम सुरक्षा’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे.
या ग्रुपच्या माध्यमातून दररोज रात्रीच्या परिस्थितीचे अपडेट दिले जात आहेत. तसेच स्थानिक तरुण स्वतः रात्री गावात गस्त घालत आहेत.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त तातडीने वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जनावरे चोरी जाण्यापासून बचावली असली, तरी परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रफिक पटेल | एनटीव्ही न्यूज मराठी | येडशी
