NANDED | नांदेडच्या मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील बाबू पुंडलिक गायकवाड यांच्या खून प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांनी आणखी एका आरोपीला तेलंगणातून, तर एका संशयिताला दापका राजा येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

20 ऑगस्ट रोजी लादगा शिवारात बाबू गायकवाड यांच्या डोक्यात चाकूने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. मागील गुन्ह्याच्या रागातून किशन जोगदंड, सोहम उर्फ सोम्या बयास आणि मंग्या लिंगे यांनी संगनमताने हा खून केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने 22 ऑगस्ट रोजी शेख जिलाणी याला तेलंगणातून, तर गणेश जोगदंड याला दापका राजा येथून ताब्यात घेतले. या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.

मयताच्या नातेवाईकांनी अद्याप शवविच्छेदनास परवानगी दिलेली नसल्याने मृतदेह नांदेडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांकडून समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुजीब सय्यद, मुखेड, नांदेड
एनटीव्ही न्यूज मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *