मुखेड येथील युवक कंत्राटदार गजानन भुजंगराव देवकत्ते यांनी नवी मुंबईतील राहत्या घरी २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्षांपासून अंदाजे दोन कोटी रुपयांची थकीत देयके मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते, असा दावा करण्यात आला आहे.

गजानन देवकत्ते हे गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहून सार्वजनिक बांधकाम विभागात लहान-मोठी कामे करत होते. त्यांनी केलेल्या कामाची अंदाजे दोन कोटी रुपयांची देयके दोन वर्षांपासून रखडली होती. देयके काढण्यासाठी त्यांनी वारंवार लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

मृत कंत्राटदाराच्या पत्नी शितल देवकत्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी भूषण फोगाडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. थकीत देयके काढण्यासाठी पाच लाख रुपये देऊनही, आणखी आठ लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत तात्कालीन इलाका शहर विभागाचे कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर यांना ४ जुलै रोजी ‘आम्ही जगावे कसे व मरावे काय’ म्हणून लेखी पत्र दिल्याचेही शितल देवकत्ते यांनी सांगितले. कामाची देयके मिळत नसल्यामुळेच पतीने आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या गंभीर प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी देवकत्ते परिवाराकडून करण्यात आली आहे.

मुजीब सय्यद | एनटीव्ही न्यूज मराठी | मुखेड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *