जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात वीज वितरण कंपनीच्या डीपीवर अवैध वीज कनेक्शन घेऊन वीज वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अधिकृत वीज कनेक्शनधारक शेतकऱ्यांना परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात डीपी क्रमांक सहावर अवैध वीज कनेक्शन टाकून सर्रास वीज वापर केला जात असल्याचा आरोप अधिकृत वीज कनेक्शनधारक शेतकऱ्यांनी केला आहे.
संबंधित डीपीवर एकूण दहा ग्राहकांची मर्यादा असल्याचे सांगितले जात असून, त्यापैकी केवळ सहा शेतकऱ्यांकडे अधिकृत वीज कनेक्शन आहेत. मात्र, इतर चार शेतकरी आकोडे टाकून अवैधरीत्या वीज वापरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या अनधिकृत वीज वापराचा परिणाम अधिकृत कनेक्शनधारक शेतकऱ्यांवर होत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.
या अवैध वीज कनेक्शनधारकांना कोणाचा आशीर्वाद आहे, याची शहानिशा वीज वितरण कंपनीने करावी, अशी मागणी अधिकृत वीज कनेक्शनधारक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि अनधिकृत वीज कनेक्शनबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
