जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या नायगावात पाणीटंचाई भासण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याआधीच नागरिक आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन भाजपाचे दिव्यांग पूर्व जिल्हाध्यक्ष अरुण पाटील यांनी केले आहे.

नायगावात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी सरपंच आणि सदस्यांनी निवडून आल्यानंतर गावासाठी काहीतरी करू, असा विचार करणे चुकीचे ठरेल. त्याऐवजी सध्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे अरुण पाटील यांनी म्हटले आहे.

सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना म्हणून पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. प्रत्येक नळाला तोटी बसवणे आणि रस्त्यावर अवाजवी पाणी वाया घालवणे थांबवणे गरजेचे आहे. कोणी सांगूनही ऐकत नसेल, तर त्याला एक-दोन वेळा समजावून सांगावे आणि आवश्यकतेनुसार कायद्याचा धाक दाखवावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

नायगावचे मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत विभागाने शासननियुक्त प्रशासकांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करावी. इतर गावांमध्ये अशा उपाययोजना नंतर झाल्या तरी चालतील; मात्र नायगावसाठी ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकमेकांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा आपल्या गावात दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. गावात भरपूर पाणी आहे आणि दिवसातून दोन-तीन वेळा नळाला पाणी येते, त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही, असा विचार करणे योग्य नसल्याचेही अरुण पाटील यांनी म्हटले आहे.

पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *