यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामाचे अखेर भूमिपूजन करण्यात आले आहे. बुऱ्हाणपूर-तळोदा या गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १५ कोटी रुपये निधीच्या सहा किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे आयोजित कार्यक्रमात कुदळ मारून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला.
बायपासला जोडणाऱ्या चौपदरीकरणाच्या या हायब्रिड रस्त्याच्या कामाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर कामाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, कृउबाचे माजी सभापती हर्षल पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील (नाना), माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, भाजपा यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका सौ. कल्पना वाणी, नगरसेविका सौ. वर्षा येवले, नगरसेविका नन्नवरे आणि कृउबाच्या संचालिका कांचन फालक यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
