यावल तालुक्यातील गिरडगाव येथे एसटी बस नियमितपणे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गिरडगाव येथे एसटी बस थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, ॲड. देवकांत पाटील, समाधान पाटील आणि शिवराम वैदू यांनी यावल बसस्थानक व्यवस्थापनाकडे निवेदन दिले आहे. गिरडगावातून सकाळी शिक्षणासाठी यावल व इतर ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, सकाळच्या वेळेत एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. त्यामुळे शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
सकाळी ६.०० वाजताची एसटी बस गिरडगाव येथे अधिकृतपणे थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनासोबत श्री. ना. भा. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच ग्रामपंचायत गिरडगाव यांची पत्रे जोडण्यात आली आहेत. निवेदन स्वीकारताना एसटी कर्मचारी प्रतिनिधी सागर सावंत उपस्थित होते. मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
