जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सुधर्मा सामाजिक संस्थेने विजयादशमी आणि संस्थेचा २४ वा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. केक न कापता वंचित मुलांना मदत करण्याची परंपरा जपत संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवला.
यावल तालुक्यातील काळाडोह येथे काळाडोह आणि धुळेपाडा या दोन जिल्हा परिषद शाळांचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य, मिठाई आणि फराळाच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साड्या देण्यात आल्या.
मंथन परीक्षेत यश मिळवलेल्या १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या वृपाली बारेला हिला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
गावात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या मंगिलाल बारेला, जाड्या बारेला, मालसिंग बारेला, नानसिंग बारेला, भगादा बारेला, मिताली बारेला, कमलाबाई बारेला, संगिता बारेला, आराधना बारेला आणि एमलाबाई भिलाला यांना श्रीमद्भगवद्गीतेची प्रत आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेला मदत करणाऱ्या काळाडोह आणि धुळेपाडा येथील पालकांनाही वाचनाची पुस्तके देण्यात आली. यावेळी सुनीता बेलसरे यांनी सुधर्माच्या कार्याचे कौतुक केले.
ज्यांना कोणीही नाही, अशा २०० मुलांचे पालकत्व सुधर्मा संस्थेने स्वीकारले असून, त्यांना सायकल, शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे हाच विजयादशमीचा खरा संदेश असल्याचे सांगितले. सुधर्मा संस्था वंचित मुलांचा आधार असून, या मुलांनी भविष्यात चांगले नागरिक बनून देशसेवा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे, रोशनी ननवरे, भाग्यश्री ननवरे, नानाभाऊ चव्हाण, सुनीता बेलसरे, अरुण बेलसरे आणि दिनकर बाविस्कर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ज्योती जाधव, हमीद तडवी, सुरंग बारेला आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी शाळेच्या वतीने शिक्षक श्रीकांत मोटे यांनी आभार मानले.
