जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी नगरसेवकाला पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
यावल शहरातील दुर्गा विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी (वय ३३, रा. गुरववाडा, यावल) हे व्यवसायासोबतच समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या वर्षभरापासून यावल नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत.
यंदाच्या दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रभागातील विविध मंडळांच्या विसर्जन व्यवस्थेचे नियोजन आणि अडचणी सोडविण्यात ते सहभागी होते. फिर्यादीनुसार, त्यांच्या प्रभागातील १९ मंडळांचे विसर्जन बाकी होते. दुपारी साडेतीन वाजेपासून मंडळांच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सुमारे ४० मंडळांनी सहभाग घेतला. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्व मंडळांची वाद्ये आणि बँड पथके बंद झाली.
त्यानंतर सागर चौधरी पायी घरी जात असताना चावडी चौकाच्या दिशेने सागर कांबळे यांच्या घरासमोर रस्त्यावर चौघे उभे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामध्ये विलास रमेश चौधरी, गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी आणि दिनेश गोपाल चौधरी यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, विलास चौधरी याने पांढऱ्या रंगाची स्कूटी समोर आणून रस्ता अडविला आणि सागर चौधरी यांना उद्देशून अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी मिळून पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी दिनेश चौधरी याने हातातील लाकडी फळीने सागर चौधरी यांच्या डाव्या कानावर मारले, तर अक्षय चौधरी याने हातातील धारदार चाकूसारख्या वस्तूने पोटाच्या डाव्या बाजूला वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात चौधरी यांच्या डाव्या कानाला आणि पोटाच्या डाव्या बाजूला दुखापत झाली.
घटनेनंतर रस्त्याने जाणारे नरेंद्र माळी आणि राहुल चौधरी यांनी जखमी सागर चौधरी यांना मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
या प्रकरणी सागर चौधरी यांनी विलास रमेश चौधरी, गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी आणि दिनेश गोपाल चौधरी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. यावल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, तपासाची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल सुनील रमेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची नोंद प्रथम माहिती अहवालात आहे.
