जळगाव जिल्ह्यातील यावल शहरासह १७ गावांमध्ये दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडल्या. एकूण ८९ सार्वजनिक आणि खासगी मंडळांनी रात्री दहाची वेळमर्यादा पाळत दुर्गादेवीला निरोप दिला.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरासह १७ गावांमध्ये गुरुवारी दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यावल शहरातील ४३ सार्वजनिक आणि खासगी मंडळांसह ग्रामीण भागातील एकूण ८९ मंडळांनी दुर्गादेवीचे विसर्जन केले.
मिरवणुका पाहण्यासाठी शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री दहाची वाद्यवाजवण्याची वेळमर्यादा सर्व मंडळांनी पाळली. शहरातील मशिदीजवळ शांतता समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिज बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद आणि उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उर्वरित काही गावांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी विसर्जन होणार आहे.
