वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक वैभव दामोदर पराते यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी त्यांना सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मंगरूळपीर येथील तक्रारदार तुळशीराम भडागे यांच्याकडे लाचेची मागणी करून यशस्वी सापळ्यादरम्यान दोन हजार रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात आरोपी पोलीस उपनिरीक्षक वैभव दामोदर पराते यांना दोषी ठरवण्यात आले. मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हा निकाल दिला.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत पराते यांना तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आहे. तसेच कलम १३(२) सहकलम १३(१)(ड) अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मंगरूळपीर येथील अशोक नगर परिसरात एका महिलेच्या घरी साहेबराव खडसे दिसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. साहेबराव खडसे हे तक्रारदार ग्यानू भडांगे यांचे मित्र असल्याने त्यांना सोडवण्यासाठी ग्यानू भडांगे मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव पराते यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप होता.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाने पडताळणी आणि सापळा कारवाई केली. त्यामध्ये वैभव पराते यांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक १३०/२०१६ नुसार लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १३(१)(ड) सह कलम १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल गांगुर्डे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी युक्तिवाद केला. लाचलुचपत विभाग, अमरावतीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी प्रकरणात वेळोवेळी सहकार्य केले, तर पैरवी अधिकारी म्हणून गजानन ढगे यांनी काम पाहिले.
