जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात चोपडा रस्त्यालगत असलेल्या जुन्या फॉरेस्ट कॉलनीमध्ये २८ वर्षीय संजय खेडकर यांचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
संजय खेडकर हे यावल शहरातील जुन्या फॉरेस्ट कॉलनीतील रहिवासी होते. त्यांनी आपल्या राहत्या घरातील शेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी अक्षय खेडकर यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी पुढील तपास करीत आहेत.
