जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनवेल येथे विजयादशमीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत गावातील सर्व मंदिरांना फुलहार अर्पण करून हिंदू तरुणांनी अनोखी परंपरा जपली. या उपक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
विजयादशमीच्या निमित्ताने मनवेल येथील हिंदू तरुणांनी गावातील मंदिरांना फुलहार अर्पण करण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाची सुरुवात आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेला फुलहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर श्री मानकेश्वर महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री दादाजी दरबार, हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, मरीमाता मंदिर, श्री सद्गुरू केंद्र मनवेल, गावातील तीन ठिकाणच्या देवींच्या मूर्ती, दगडी येथील हनुमान मंदिर आणि वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमातून धार्मिक एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि गावातील परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला. दसऱ्यानिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा व आरती करण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतीच्या औजारांचे, तर व्यावसायिकांनी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे पूजन केले. नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
मनवेलमधील तरुणांच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांनी कौतुक केले. अबालवृद्धांच्या सहभागामुळे यंदाचा विजयादशमी उत्सव विशेष उत्साहात साजरा झाला.
