कामगार कार्यालयावर दलालांचा पेव

फुलचंद भगत
​वाशीम:-येथील सरकारी कामगार कल्याण कार्यालयात सध्या कामगारांचे ‘कल्याण’ पूर्णपणे बाजूला पडले असून, केवळ ‘स्व-कल्याण’ आणि वसुलीचा उघड धुमाकूळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचा आरोप होत आहे. कार्यालयातील एका ‘विकृत आत्म्याने’ केवळ धन गोळा करण्याच्या हव्यासापोटी जिल्ह्याभरात दलालांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. खऱ्या आणि गरजू कामगारांना जाणीवपूर्वक डावलून बोगस लाभार्थ्यांच्या नावावर शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारला जात आहे. “काम ऑनलाईन आणि वसुली ऑफलाईन” अशी नवी पद्धत रूढ करून या भ्रष्ट व्यवस्थेने स्वतःचे खिसे भरले आहेत असाही गंभिर आरोप होत असल्याने याप्रकरणी चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
शासकीय नियमांनुसार कामगार नोंदणीसाठी केवळ १ रुपया शुल्क आकारले जाते. मात्र, या कार्यालयातील दलालांमार्फत थेट १,००० ते ३,००० रुपयांची पठाणी वसुली उघडपणे केली जात आहे. गरीब कामगारांच्या हक्काच्या पैशांवर हा सरळ-सरळ दरोडा आहे.दुकानाच्या ऑनलाईन नोंदणीची शासकीय फी अवघी २३ रुपये असताना, सामान्य व्यापाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये बेकायदेशीरपणे उकळले जात आहेत. या लुटीच्या जोरावर संबंधित अधिकाऱ्याने अल्पावधीतच करोडोंची बेनामी मालमत्ता गोळा केल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

​गावोगावी दलालांचे साम्राज्य; खरे लाभार्थी वंचित

या कार्यालयाने गावोगावी आपले एजंट सक्रिय केले आहेत. दलालांमार्फत आलेले बोगस अर्ज कोणत्याही तपासणीशिवाय तात्काळ ‘पात्र’ केले जातात. याउलट, स्वतः चपला झिजवून अर्ज करणाऱ्या प्रामाणिक आणि खऱ्या कामगारांचे अर्ज किरकोळ त्रुटी काढून ‘अपात्र’ ठरवले जातात. “खरे अपात्र आणि खोटे पात्र” असा अजब आणि संतापजनक कारभार येथे सुरू आहे असाही आरोप होत आहे.या कार्यालयाचा कारभार इतका सडला आहे की, “कार्यालयीन दलालांना पैसे न देता किंवा त्रास न होता काम झालेला एकतरी खरा कामगार दाखवा आणि बक्षीस मिळवा,” असे म्हणण्याची वेळ वाशीम जिल्ह्यातील जनतेवर आली आहे. पैशाच्या माजामुळे “माझे कोणीच काही वाकडं करू शकत नाही” अशा वलग्ना करतांना ऐकीवात आहे.

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; जिल्ह्यातून तीव्र संताप

​गोरगरीब कामगारांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या या ‘विकृत आत्म्याची’ आणि त्याच्या दलालांची तसेच बोगस लाभार्थ्यांची पडताळणी करुन तात्काळ उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
​लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करावी. तसेच दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ निलंबित करावे, अशी तीव्र मागणी आता संपूर्ण वाशीम जिल्ह्यातून होत आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ आणि कडक कारवाई केली नाही, तर कामगारांच्या वतीने तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *