- रावेर-यावलमध्ये लंपीचा वाढता प्रादुर्भाव
- पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण
- तातडीने पशुवैद्यकीय पथके पाठविण्याच्या सूचना
- बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याचे आदेश
- विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी
- प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आमदारांचा भर
JALGAON | रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिजचा वाढता प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
रावेर आणि यावल तालुक्यातील बाधित तसेच संभाव्य बाधित गावांमध्ये तातडीने पशुवैद्यकीय पथके पाठवून जनावरांची तपासणी करावी, बाधित जनावरांचे विलगीकरण करावे, तसेच आवश्यक औषधोपचार आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आमदार अमोल जावळे यांनी केल्या आहेत.
तसेच विशेष लसीकरण मोहीम राबवून पुरेशा प्रमाणात लस, औषधे आणि पशुवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात याव्यात. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करून जनावरांची काळजी, विलगीकरण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अंतर्गत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवून रोगाचा प्रसार इतर गावांमध्ये तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
लंपी रोगामुळे बाधित अथवा मृत झालेल्या पशुधनाबाबत शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करून पात्र पशुपालकांना शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.
पशुधन हे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, लंपी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने प्रभावी उपाययोजना आणि विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशी भूमिका आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | जळगाव
