शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत महसूल कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पीक नुकसानीच्या पाहणीसह शेतकऱ्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या.
पाहणीदरम्यान कार्यालयातील दप्तर व अभिलेखांची तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या महसूल विषयक कामांना गती देऊन ती वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सध्या सुरू असलेल्या पीक नुकसानीच्या पाहणीच्या कामाचाही आढावा घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि पीक नुकसानीबाबत माहिती घेतली.
तसेच शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
