• बाल संस्कार विद्या मंदिरात ४९ वा गणेशोत्सव
  • भव्य मिरवणुकीने श्री गणरायांचे उत्साहात आगमन
  • विद्यार्थ्यांचा लेझीम, झांज आणि दांडिया सहभाग
  • ढोल-ताशांच्या गजराने यावल शहर दुमदुमले
  • पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
  • पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन

JALGAON | यावल येथील बाल संस्कार मंडळ, बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात यंदाचा ४९ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री गणरायांच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री गणरायांची मिरवणूक अशोक प्रभाकर गडे यांच्या घरापासून निघून वाणी गल्ली, बारी चौक, गवत बाजार, वाचनालय मार्गे बाल संस्कार विद्या मंदिर येथे पोहोचली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी ध्वज पथक, लेझीम पथक, झांज पथक, दांडिया पथक तसेच ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांमुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजावी, या उद्देशाने गणेशोत्सवाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणरायांच्या आगमनाने शाळा परिसर भक्तिमय झाला. बाल कलाकारांचे कौतुक करण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी केली होती.
या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, अतुल गर्गे, शरयु कवडीवाले, उत्सव प्रमुख संजय चौधरी, कल्याण लोंढे तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेत पाचही दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

यावल प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *