♦️ वनोली साई मंदिरात १८ ऑक्टोबरला महाप्रसाद
♦️ २५ ते ३० हजार भाविकांच्या उपस्थितीची शक्यता
♦️ १९ ऑक्टोबरला साईबाबा मंदिराची यात्रा
♦️ १२५ फूट देवकाठीची वाजतगाजत मिरवणूक
♦️ रात्री बारा गाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम
♦️ भाविकांसाठी पाणी, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादासाठी २५ ते ३० हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, दुसऱ्या दिवशी १९ ऑक्टोबरला पारंपरिक यात्राही संपन्न होणार आहे.

यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर, वनोली येथे आश्विन शुद्ध सप्तमीच्या निमित्ताने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी, ट्रस्टी, गावचे माजी सरपंच, उपसरपंच, सर्व संचालक मंडळ, विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थांनी केले आहे.
घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी आयोजित या महाप्रसादासाठी सुमारे २५ ते ३० हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भाविकांनी शिस्तीने प्रसाद घ्यावा आणि मंदिर ट्रस्ट समिती व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी श्री साईबाबा मंदिराची पारंपरिक यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी सुमारे १२५ फूट उंच देवकाठी स्नानासाठी नेण्यात येते. काठीचे स्नान करून ती सजवली जाते आणि वाजतगाजत गावात आणली जाते. डफांच्या वादनावर ग्रामस्थ एका हातात सजवलेली काठी घेऊन नृत्य करतात. सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो, तर रात्री परंपरेनुसार लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

श्री साईबाबा महाराज शिर्डीला जात असताना वनोली येथील या मंदिराच्या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना करण्यात आली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले.
या ठिकाणी भाविक नवस म्हणून गोडेतेल आणि नारळ अर्पण करतात. सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला असताना महाराजांनी मंदिरात दोन नंदादीप पाण्यावर प्रज्वलित केले होते, अशी मान्यता आहे. हे दिवे आजही अखंड तेवत असल्याचे सांगितले जाते. मंदिरात दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी बांधण्यात आली असून, भाविक नवस म्हणून तेल अर्पण करतात. हे तेल साठवून दिव्यांसाठी तसेच महाप्रसादाच्या स्वयंपाकासाठी वापरले जाते.

दरवर्षी सुमारे ४० ते ५० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. महाप्रसादाच्या तयारीसाठी वनोली, कोसगाव, दुसखेडा, म्हैसवाडी, पाडळसा, बामणोद, विरोदा, आमोदा, रिधोरी, मांगी, करंजी, वडोदा, सावदा, कासवा, अकलूद, फैजपूर आणि पिंपरूड येथील भाविक महिला स्वयंपाकासाठी मदत करतात. रात्री महाप्रसादाच्या वेळी परिसरातील तरुण वर्गही सहकार्य करतो.
महाप्रसादामध्ये साखरेची खीर, पोळ्या, गंगाफळाची भाजी आणि उडदाच्या डाळीचे वडे भाविकांना दिले जातात. भाविक साहित्याच्या स्वरूपातही देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देतात.

मंदिराच्या विकासकामांमध्ये युतीचे माजी खासदार तथा तत्कालीन आमदार आणि कृषिमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे मोठे योगदान लाभले आहे. राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अनुदानाच्या स्वरूपात सहकार्य केले आहे.
मंदिराच्या सध्याच्या विकासकामांसाठी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात आले आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून ९० लाख रुपयांचे काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक, तसेच १५ लाख रुपयांचे सहकार्य आमदार अमोलभाऊंकडून मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सभामंडप, गटार, संरक्षण भिंत आणि विद्युत सुविधांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून, तर भक्तनिवासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महाप्रसाद व यात्रेदरम्यान आरोग्य विभाग, वीज मंडळ आणि पोलीस विभाग सहकार्य करतात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली जाते. महाप्रसादानंतर हात धुण्यासाठीही पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
वनोली येथे जाण्यासाठी पाडळसा-कोसगाव-वनोली तसेच बामणोद-वनोली हे रस्ते सुस्थितीत आहेत. भाविकांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, शिस्त पाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट समितीचे विश्वस्त हिरालालभाऊ चौधरी यांनी केले आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Is this conversation helpful so far?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *