रावेर आणि यावल तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांसह तापी खोरे जलनियोजन आणि तापी महाकाय पुनर्भरण योजनेच्या अनुषंगाने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध सिंचन योजना लवकर कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील उपस्थित होते.
यावेळी रावेर–यावल विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेळगाव उपसा जलसिंचन योजना, हतनूर पाटचाऱ्या, मोर, सुखी आणि अभोडा धरण, तसेच भालोद, आमोदा–बामणोद व म्हैसवाडी उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला पणन मंत्री जयकुमारजी रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, प्रधान सचिव एकनाथ डवले आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
