जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे विजयादशमी पथसंचलनादरम्यान घडलेल्या प्रकारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने यावल पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त २५ ऑक्टोबर २०२६ रोजी किनगाव येथे विजयादशमी उत्सवानिमित्त पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. या संचलनासाठी ९ ऑक्टोबर रोजीच पोलीस प्रशासनाला लेखी पूर्वसूचना देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मात्र, काही व्यक्तींनी सार्वजनिक रस्ता अडवून संचलनाचा मार्ग बदलण्याचा आग्रह धरल्याने सकाळी ७.३० वाजता सुरू होणारे संचलन चार तास उशिरा, म्हणजेच ११.३० वाजता सुरू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कारवाई, सार्वजनिक रस्ता सर्वांसाठी खुला ठेवण्याबाबत लेखी आदेश आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या चार प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

मागण्यांवर तातडीने लेखी निर्णय न घेतल्यास लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किनगावमधील या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *