राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, तरीही काही फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वसुलीसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. याच मुद्द्यावर दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हा पूर्व अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या फायनान्स कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा कंपन्यांना हंटर मारून बाहेर काढावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हा पूर्व अध्यक्ष हरिभाऊ पाटील, रा. दहिगाव, ता. यावल यांनीही शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने सर्व कर्जवसुलीला स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही मायक्रो फायनान्स आणि इतर फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांना कुलूप लावणे आणि त्यांच्या मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्नही होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अशा प्रकारचा त्रास होत असल्यास प्रहार संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आमदार बच्चू कडू यांनी आवाहन केले आहे. मात्र, काही गरजू शेतकरी अद्याप संपर्क साधत नसल्याचे हरिभाऊ पाटील यांनी म्हटले आहे.

“ज्या नागरिकांना सक्तीच्या कर्जवसुलीचा त्रास होत असेल, त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून संबंधित प्रकाराची माहिती द्यावी. वसुलीला स्थगिती आहे, त्यामुळे वसुली करता कामा नये. शेतकरी अडचणीत सापडला आहे, याचे भान ठेवून फायनान्स कंपन्यांनी वसुली थांबवावी. अन्यथा आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,” असा इशारा हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *