इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून बोरीपर्यंत सिंचनाचे पाणी न पोहोचल्याने कोपरा-बोरी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उमरखेड येथील ऊर्ध्व पैनगंगा पाटबंधारे कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१३ नोव्हेंबर रोजी संतप्त शेतकऱ्यांनी उमरखेड येथील पाटबंधारे कार्यालयात निवेदन सादर केले. बोरी चा. येथील शेती इसापूर धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. चालगणी शाखा कालव्याद्वारे बोरीपर्यंत पाणी पोहोचणे अपेक्षित असताना अद्याप सिंचनाचे पाणी न मिळाल्याने रब्बी हंगामातील उभी आणि नुकतीच पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत.
दरवर्षी हक्काच्या सिंचनासाठी संघर्ष करावा लागत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सिंचन वितरण व्यवस्थेतील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करून संबंधित मायनर व वितरिकेद्वारे बोरीच्या शिवारात तातडीने आणि पुरेशा दाबाने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी चक्रधर पाटील देवसरकर, प्रकाशराव माने, धनंजय माने, विनोद माने, अमोल माने, गणेश माने, शंकर माने, दिगांबर माने, प्रकाश माने, राजू माने, केशव माने, संजय माने, प्रदीप माने, रामराव माने, प्रसाद माने, निर्गुण माने, वैभव माने, परमेश्वर माने, विजय माने, दत्ता माने आणि गजानन माने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून ९ क्युमेक्स पाणी सोडण्यात आले असून, चालगणी शाखा कालव्याद्वारे कोपरा शिवारापर्यंत पाणी पोहोचले आहे. नदी, नाले, विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवसांत बोरीपर्यंत पाणी पोहोचवण्यात येईल, अशी माहिती ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक २, उमरखेडचे उपअभियंता एस. ए. खोकले यांनी दिली.
आता उपअभियंता एस. ए. खोकले यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दोन दिवसांत बोरीपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचते का, याकडे कोपरा-बोरी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
