क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, यावल आदिवासी विकास विभागाचे अरुण पवार सर आणि जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आदिवासी महिला बचत गटांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रे आणि धनादेशांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला बळ मिळणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी शौर्य, संघर्ष आणि अदम्य राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून जनजातीय समाजाच्या स्वाभिमानासाठी व हक्कांसाठी लढा दिला. त्यांचे कार्य आणि विचार संपूर्ण देशासाठी आजही प्रेरणादायी असून, पुढील पिढ्यांनाही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील.
