दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एरंडोलमध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सत्यशोधक समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात महापुरुषांना अभिवादन करत सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात सत्यशोधक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बळीराजा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. काळ्या मातीत राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या त्यागाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित या महोत्सवाला शहरासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शहरातील मेनरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेची शहरातील मुख्य मार्गावरून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीमुळे शहरात उत्साह, मांगल्य आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांचे कष्ट, देशाच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर प्रकाश टाकला. ‘कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान हाच खरा दिवाळी पाडवा आहे,’ असा संदेश देत जगाचा पोशिंदा बळीराजा सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी सत्यशोधक समिती एरंडोलचे सर्व पदाधिकारी, शहरातील ज्येष्ठ नेते, विद्यमान व माजी नगरसेवक, शेकडो ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
