शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून, अवघ्या १२ तासांत बोरी (चा.) शिवारातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचले आहे. उपविभागीय अभियंता श्रीराम खोकले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी उमरखेड तालुक्यातील मौजे बोरी (चा.) येथील सुमारे १०० शेतकऱ्यांनी शुक्रवार, दिनांक १३ रोजी ऊर्ध्व पैनगंगा पाटबंधारे प्रकल्प क्रमांक २ च्या उमरखेड येथील उपविभागीय अभियंता कार्यालयाला घेराव घातला होता.

इसापूर धरणाचे पाणी १० नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत पाणी न आल्याने बोरी (चा.) लाभक्षेत्रातील उभी रब्बी पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच धनंजय माने, प्रकाश आबाजी माने, बाळू माने, विनोद माने, शंकर माने, दिगंबर माने, गणेश माने, रघुनाथ माने, कामाजी माने, दत्ता माने, सिकंदर माने, राजू माने आणि प्रदीप माने यांच्यासह सुमारे १०० ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.

यावेळी उपविभागीय अभियंता श्रीराम खोकले यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत पाणी पोहोचवण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी श्रीराम खोकले यांनी या कामाला प्राधान्य दिले. नदी, नाले, बोअरवेल आणि विहिरींची पाणीपातळी कमी झाल्यामुळे चालगणी शाखा कालव्यावर पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. संबंधित भागातील शेतकऱ्यांनी उपसा सुरू करून सिंचन सुरू केले होते.

यानंतर पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दोन दिवस उपसा बंद करण्याचे आवाहन केले. तसेच नोटीस बजावून मुख्य कालव्यावरील सिंचन पूर्ण झालेल्या वितरिका बंद करण्यात आल्या. पूर्ण दाबाने पाणी सोडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले.

उपविभागीय अभियंता श्रीराम खोकले यांनी स्वतः मैदानात उतरून तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर मात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. परिणामी, दोन दिवसांचा दिलेला शब्द पूर्ण होण्यापूर्वीच अवघ्या १२ तासांत बोरी (चा.) येथील मायनरमध्ये पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे, मायनरच्या टेल भागातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. पाटबंधारे विभागाच्या या तत्परतेमुळे संकटात सापडलेल्या रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत अवघ्या १२ तासांत पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल बोरी (चा.) येथील सरपंच आणि समस्त शेतकरी बांधवांनी ऊर्ध्व पैनगंगा पाटबंधारे प्रकल्प क्रमांक २ चे उपविभागीय अभियंता श्रीराम खोकले तसेच त्यांच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *