वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात आतापर्यंत १५ रुग्ण आढळले असून, ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अतुल वांदिले यांनी गावाला भेट देत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कुटकी या अवघ्या ३०० लोकसंख्येच्या गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आहे. यात ११ वर्षीय कुमुद चंद्रशेखर शेंडे या बालिकेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गावात नदीतून थेट पाणीपुरवठा होत असून, पाणी शुद्धीकरणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी कुटकी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मृत बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी अतुल वांदिले यांनी मृत बालिकेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, गावात विशेष वैद्यकीय पथक पाठवून नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
यावेळी बोलताना अतुल वांदिले म्हणाले, “३०० लोकसंख्येच्या गावात १५ डेंग्यूचे रुग्ण आणि एका चिमुकलीचा मृत्यू ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.”
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, तालुकाध्यक्ष मिलिंद कोपुलवार, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शर्मा, अनिल बुलानी, जितेंद्र कुकसे, श्रीकांत भगत आदी उपस्थित होते.
