पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगाव औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांना कालबद्ध उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. यावेळी औद्योगिक परिसरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविणे, त्यांचे सर्वेक्षण करून नैसर्गिक पाणीप्रवाह मोकळा ठेवणे आणि पावसाळ्यापूर्वी पाणी निचऱ्याचे नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

रस्ते विकासकामांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये काढून डिसेंबरअखेर कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्यासह वारंवार नियम मोडणाऱ्या कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे.

तसेच औद्योगिक कंपन्यांच्या सहभागातून रस्ते सुशोभीकरण, हरितीकरण आणि दुभाजकांची देखभाल केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचे नियोजन असून, प्लास्टिक कचरा संकलनासाठीही तातडीची पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून औद्योगिक परिसरातील सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *