यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळांना सुट्टी लागल्यानंतर बंद करण्यात आलेल्या अनेक बसफेऱ्या शाळा सुरू होऊनही अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
यावल आगारांतर्गत ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी लागल्याने अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतरही या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत असून, बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
मनवेल-थोरगव्हाण मार्गासह इतर ग्रामीण मार्गांवरील बससेवा अद्याप बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बंद केलेल्या बसफेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात, अशी मागणीही होत आहे.
यावल आगार यावर्षी उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळे आगाराने ग्रामीण भागातील बससेवेकडे विशेष लक्ष दिल्यास उत्पन्नात आणखी वाढ होऊ शकते आणि विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोयही टाळता येईल, असे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, याबाबत यावल आगाराचे प्रमुख इम्रान पठाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगारांतर्गत बंद झालेल्या काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित बसफेऱ्या सोमवारपासून नियमितपणे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा आगाराचा प्रयत्न राहील.
