दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटी महामंडळाच्या यावल आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे. अवघ्या एका दिवसात २१ लाखांहून अधिक, तर दिवाळी विशेष वाहतुकीत दोन कोटींहून अधिक उत्पन्न मिळवत यावल आगाराने जळगाव विभागाचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यावल आगाराने दिवाळी जादा वाहतूक सन २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत यावल आगाराच्या बसेसने तब्बल ३ लाख १५ हजार किलोमीटर धाव घेतली. या कालावधीत आगाराने विना सवलत १ कोटी १३ लाख २१ हजार ८५० रुपये, तर सवलतीसह एकूण २ कोटी ९ लाख १२ हजार ४५० रुपयांचे उत्पन्न मिळवले.
विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी यावल आगाराने एकाच दिवसात २५ हजार किलोमीटर धाव घेतली. यामध्ये विना सवलत ११ लाख ५ हजार ४३५ रुपये, तर सवलतीसह तब्बल २१ लाख १५ हजार ६५० रुपयांचे उत्पन्न मिळवले.
दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी यावल आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी, प्रशासकीय, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जळगाव विभागीय अधिकारी वर्गाने लेखी पत्राद्वारे सर्वांचे कौतुक केले असून, पुढील काळातही अशीच कामगिरी करून विभागाच्या उत्पन्नवाढीस हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावल आगारात नव्याने २५ बसेस दाखल झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याची चर्चा तालुक्यातून व्यक्त केली जात आहे. अशी माहिती आगारप्रमुखांनी दिली आहे.
