AKOLA | अकोला विमानतळाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा होणार का? पश्चिम विदर्भाच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी खासदार अनुप धोत्रे यांनी थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेत महत्त्वाची मागणी केली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि केंद्राकडून काय आश्वासन मिळाले? पाहूया…


अकोला जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भाच्या विकासाला चालना देणाऱ्या अकोला (शिवणी) विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘मॉडिफाइड उडान’ योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा आणि येथून प्रवासी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी अकोल्याचे खासदार अनुप संजय धोत्रे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्याकडे केली.

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान खासदार धोत्रे यांनी अकोला विमानतळाची सद्यस्थिती आणि तांत्रिक गरजांचा सविस्तर आढावा केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडला.

केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी ‘मॉडिफाइड उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील १०० अविकसित आणि हवाई सेवा नसलेल्या विमानतळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुढील आठ वर्षांत १२ हजार १५९ कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर संपूर्ण योजनेचा एकूण आराखडा २८ हजार ८४० कोटी रुपयांचा आहे. या निधीतून अकोला विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली.



सध्या अकोला विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ४०० मीटर आहे. ती पहिल्या टप्प्यात १ हजार ८०० मीटर आणि पुढे २ हजार ८०० मीटरपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रवासी विमानांना येथे उतरणे शक्य होणार आहे.

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या २२.२४ हेक्टर अतिरिक्त भूसंपादनाला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय आणि निधीची मान्यता दिली असून, भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळाली आहे. आता केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून तांत्रिक आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प वेगाने पूर्ण होऊ शकतो.

अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक, कृषी आणि व्यापारी केंद्र आहे. तसेच अकोल्यापासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे संतनगरी शेगाव आहे. अकोल्यातून विमानसेवा सुरू झाल्यास देश-विदेशातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसह उद्योजक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली. ‘मॉडिफाइड उडान’ योजनेअंतर्गत अकोला विमानतळाचा विकास करून येथून लवकरात लवकर नियमित हवाई सेवा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि मंत्रालयामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले.

#Akola #AkolaAirport #ModifiedUDAN #AnupDhotre #RamMohanNaidu #AirportDevelopment #Shegaon #GajananMaharaj #WesternVidarbha #MaharashtraNews #NTVNewsMarathi #अकोला #अकोलाविमानतळ #अनुपधोत्रे #शेगाव #मराठीबातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *