दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होत असतानाच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात आला आहे. ३१ वर्षीय व्यक्तीसोबत होणारा हा विवाह प्रशासन, सामाजिक संस्था आणि बालसंरक्षण यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नातून थांबवण्यात आला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चाईल्डलाईनच्या समुपदेशक शरयू तळेगावकर, सुपरवायझर रोहित भाकरे आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बालकल्याण समिती अकोला यांच्यासमक्ष बालिकेचे आई-वडील, प्रस्तावित वर आणि वऱ्हाडी मंडळींना उपस्थित करून बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम बाल संरक्षण समितीच्या उपस्थितीत आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
बालविवाह रोखणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, बालविवाहमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.
