भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभरात जनजाती गौरव सप्ताह साजरा केला जात आहे. याच निमित्ताने एरंडोलमध्ये आयोजित विशेष शिबिरातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी संस्कृतीचे जतन आणि समाजसुधारणेच्या कार्याला उजाळा देण्यासाठी जनजाती गौरव सप्ताह साजरा केला जात आहे.

या मोहिमेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल आणि आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी एरंडोल येथील शासकीय वसतिगृहात विशेष कार्यक्रम आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अमोल बन, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वाय. एच. महाले, डॉ. धीरज मराठे आणि तालुका पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर उपस्थित होते. मान्यवरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरात ९० लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतील तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली लाभार्थ्यांची बँक खाती पुन्हा सुरू करून देण्यात आली. तसेच १३ गरजू महिला लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट योजना आणि राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल विजय गाढे, सोनबर्डी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील, अधीक्षक दिगंबर पाटील, पातरखेडे आश्रमशाळेचे अधीक्षक किशोर झोळणे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक नरेंद्र तिरभाने यांनी केले. या शिबिरामुळे एरंडोल तालुक्यातील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *