JALGAON | दिवाळीच्या गर्दीचे नियोजन अन् प्रवाशांना सुरक्षित सेवा… एरंडोल एसटी आगाराने अवघ्या ११ दिवसांत उत्पन्नाचा नवा विक्रम नोंदवला आहे. लाखो किलोमीटरचा प्रवास आणि हजारो प्रवाशांची वाहतूक करत आगाराने मिळवलेल्या या यशाची वरिष्ठ स्तरावरही दखल घेण्यात आली आहे.
दिवाळी सणाच्या अवघ्या ११ दिवसांच्या हंगामात एरंडोल राज्य परिवहन बस आगाराने तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात ३९ लाख रुपयांची वाढ झाली असून, १ लाख १३ हजार प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवून आणण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आणि यंत्र अभियंता संदीप पवार यांच्या हस्ते आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आगाराने विशेष नियोजन केले होते. अवघ्या ५९ बसगाड्यांच्या माध्यमातून २ लाख ६९ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यात आला.
प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण, विठ्ठलवाडी, सेलवास, अकोला आणि सुरत या नवीन लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात आल्या. याशिवाय पुणे रातराणी सेवेसह छत्रपती संभाजीनगर, शिरपूर, धुळे आणि इतर ग्रामीण व शहरी मार्गांवर जादा बसगाड्या सोडण्यात आल्या.
चालक आणि वाहकांनी जादा कामगिरी करत वाहतूक सुरळीत ठेवली, तर यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी सर्व ५९ बसगाड्या मार्गावर धावण्यासाठी सज्ज ठेवल्या. आगार व्यवस्थापक दिलीप महाजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून गर्दीच्या मार्गांवर तातडीने बस उपलब्ध करून देण्यात आल्या.
या यशाचे खरे शिल्पकार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि सर्व सहकारी असल्याचे सांगत, त्यांच्या मेहनत, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेमुळेच उत्पन्नाचा हा विक्रम शक्य झाल्याचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले.
#Erandol #Jalgaon #MSRTC #STBus #DiwaliSpecial #RecordIncome #TransportNews #DilipMahajan #MaharashtraNews #NTVNewsMarathi #एरंडोल #जळगाव #एसटीमहामंडळ #दिवाळी #विक्रमीउत्पन्न #प्रवासीसेवा #मराठीबातम्या
