हृदय नेहमीच्या जागी नसून छातीच्या उजव्या बाजूला… त्यात हृदयाच्या झडपेत गंभीर बिघाड! अशा दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत ६० वर्षीय रुग्णावर अहिल्यानगरमधील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांसमोर मोठे आव्हान असतानाही मायट्रल झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाला सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अहिल्यानगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जन्मतःच हृदय छातीच्या उजव्या बाजूला असलेल्या ६० वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीची मायट्रल झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. हृदयाच्या असामान्य रचनेमुळे डॉक्टरांसमोर विशेष आव्हान निर्माण झाले होते.

काही महिन्यांपासून रुग्णाला श्वास घेण्यास त्रास, सतत थकवा आणि खोकला जाणवत होता. तपासणीत मायट्रल झडपेचा गंभीर विकार आढळला. रुग्णाला जन्मजात डेक्स्ट्रोकार्डिया असल्याने हृदय नेहमीच्या डाव्या बाजूऐवजी छातीच्या उजव्या बाजूला होते. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी हृदयाची दिशा, अंतर्गत रचना आणि रक्तवाहिन्यांचा विशेष अभ्यास करण्यात आला.

हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. विनोद चिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकारग्रस्त मायट्रल झडप काढून कृत्रिम झडप बसविण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. राहुल मामडे, डॉ. हर्षल वाळुंज आणि डॉ. केदार देशमुख यांनीही या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याला ठणठणीत डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयाच्या कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी अर्थात CVTS विभागाने २०१६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत २ हजार ३३३ प्रमुख हृदयशस्त्रक्रिया, तर डायलिसिस रुग्णांसाठी २ हजार १६३ एव्ही फिस्टुला प्रक्रिया केल्या आहेत. बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांची दुरुस्ती व बदल, जन्मजात हृदयदोषांवरील ASD/VSD शस्त्रक्रिया आणि रक्तवाहिन्यांच्या फुगवट्यावरील उपचारांसह विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत २०१४ ते जुलै २०२६ या कालावधीत रुग्णालयाच्या नोंदीनुसार १ लाख ४३ हजार ९९३ लाभार्थ्यांना उपचार मिळाले आहेत. २०१४ मध्ये १५३ असलेली वार्षिक लाभार्थी संख्या २०२५ मध्ये २० हजार ६०१ पर्यंत पोहोचली. शासकीय आरोग्य योजनांच्या कामगिरीबद्दल रुग्णालयाला २०१८ पासून दरवर्षी प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमधून रुग्ण विविध उपचारांसाठी या रुग्णालयात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. हृदयविकार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील विशेष उपचारांसाठी रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत.

नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. सुपर स्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

#Ahilyanagar #VikhePatilHospital #HeartSurgery #Dextrocardia #MitralValveReplacement #CardiacSurgery #MedicalAchievement #Healthcare #MaharashtraNews #NTVNewsMarathi #अहिल्यानगर #हृदयशस्त्रक्रिया #मायट्रलझडप #डेक्स्ट्रोकार्डिया #वैद्यकीयउपचार #आरोग्यसेवा #एनटीव्हीन्यूजमराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *