हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या एरंडोलच्या नथ्थू बापू उरूसाला रविवार, २९ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मानाची भगवी चादर, भव्य मिरवणूक, कुस्त्यांचे सामने आणि यात्रेच्या आकर्षणांनी शहरात उत्सवाची रंगत पाहायला मिळणार आहे.

एरंडोलच्या बुधवार दरवाजा परिसरात भरणारा नथ्थू बापू उरूस चार दिवसांचा असला, तरी पुढील १० ते १५ दिवस यात्रेचा उत्साह कायम राहणार आहे. नथ्थू बापू हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या समाधीवर शिरणी, बत्तासे, चादर आणि कापडी घोडा अर्पण करण्याची परंपरा आहे.

पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था आणि उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढून मानाची भगवी चादर समाधीवर चढवण्यात येणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

यात्रेत भजी, गुळाची जिलेबी, आकाश पाळणे, रहाट पाळणे, मेरी गो राऊंड, खेळणी, संसारोपयोगी वस्तू आणि विविध दुकाने आकर्षण ठरणार आहेत. तसेच जंगी कुस्त्यांचे सामनेही आयोजित करण्यात आले आहेत.

या उत्सवासाठी मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील विविध भागांसह गुजरातमधील सुरत आणि मध्यप्रदेशातून भाविक एरंडोलमध्ये दाखल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *